A longest Working Day by Nilesh Patankar
सकाळी ९ ची वेळ, रस्त्यावरची रोजची अडथळा शर्यत पार करत ऑफिसमध्ये पोहोचलो. कार्ड पंच केले, अर्थात 'आम्ही आलोत' हि वर्दी देऊन ऑफिसमध्ये प्रवेश केला.
अजून आत शुकशुकाट होता. कुठेतरी १-२ जण आले होते, कीबोर्डची खडखड, फोनच्या आणि मोबाईलच्या अखंड चालू असणाऱ्या रिंग्स आणि त्याहून मोठयांदा चालणारी लोकांची बडबड ह्यातले काही अजून चालू झाले नव्हते. सर्वत्र एक शांत आणि प्रसन्न वातावरण, अर्थात माझी ऑफिस मधली सर्वात आवडती वेळ.
नेहमी प्रमाणे मी इनबॉक्स ओपन केला, डझनभर मेल माझी वाट पाहत होते.
‘बापरे आज तर खूपच काम आहे, आज अजिबात वेळ वाया घालवायचा नाही’ असा विचार करून कोणत्याही कर्तव्यदक्ष्य आणि कार्यतत्पर आईटी इंजिनिअर प्रमाणे मी कॅन्टीनचा रस्ता धरला..
नेहमी प्रमाणे एक सामान्य दिवस चालू झाला होता.
मनसोक्त चहा मारून डेस्कवर परत आलो. आता शांतता, प्रसन्नता कुठेतरी गायब झाली होती. सगळीकडे कामाची धावपळ चालू झाली होती. एक एक करून मेल वाचणे चालू केले.
आणि माझे हास्य एकदम गायब झाले, चेहर्याचा रंग उडाला
कारणच तसे होते आज परत "GO LIVE" होते.
म्हणजे आज रात्रीचा आमचा मुक्काम ऑफिसमध्ये.
रात्रीचे १०-१०.३० वाजले असावेत, आमचा दुसरा पेग चालू होता, अजून ऑफिसचे काम सुरु होण्यासाठी बराच वेळ होता. सगळे अगदी ठरल्याप्रमाणे चालू होते. अगदी लिमिटमध्ये घेऊन आम्ही परत निघणार होतो, आमचं एक आहे बाकी काही असो पण कुठल्याही गोष्टीमध्ये अती करायचे नाही. त्यात आज तर ओवर नाईट ऑफिसमध्ये काम करायचे आहे. त्यामुळे अगदी लिमिटेड. आम्ही निघणार इतक्यात अजून एक मित्र जॉईन झाला. मग त्याला कंपनी म्हणून आम्ही अजून एक एक पेग मागवला. मी तसा नेहमी लिमिट मधेच असतो, पण मैत्री.. ती सुद्धा जपली पाहिजे. ११ वाजले, आता लवकर पोहोचले पाहिजे म्हणून बिल मागवले तोच तो मित्र म्हणाला, "अजून एकच स्मॉल मग जा तुम्ही, Go live च्या नावाचा एक लास्ट".
तुमचा गैरसमज नको म्हणून सांगतो. मी नेहमी लिमिट मधेच असतो आणि काहीही झाले माझा हा नियम मी कधी मोडत नाही, शिस्त म्हणजे शिस्त. पण आज माझा थोडा नाईलाज झाला, Go live च्या नावाचा पेग सोडून जाणे म्हणजे. परत सांगतो मी काही अंधश्रद्धाळू नाही पण कसे आहे कशाला उगाच पनौती. टू बी ओन सेफ साईड नाहीतर तुम्हाला माहित आहेच लिमिट म्हणजे लिमिट, मी नेहमीच लिमिट मध्येच असतो. मी हि गोष्ट परत परत सांगत आहे असे वाटेल तुम्हाला पण हा चार पेग चा परिणाम नाही, माझा नियम म्हणजे काळ्या दगडा वरची रेघ हवतर तुम्ही माझ्या कोणत्याही मित्रांना कधीही विचारू शकता.
ते लगेच सांगतील कि मी कसा नेहमी लिमिट मध्ये असतो.
रात्रीच्या मोकळ्या रस्त्यावरून सुसाट गाडी चालवत आम्ही १२ च्या आसपास ऑफिसमध्ये पोहोचलो. आम्ही लिमिट मध्येच असल्यामुळे ताड ताड चालत जाऊन डेस्क वर पोहोचलो. आणि लगेच फोन लावला.
आम्ही चौघे ऑफिस मध्ये होतो, एकाच टीम मध्ये अजून सुद्धा चौघांचे विचार एकदम विरुद्ध होते.
एकाचे मत होतं "आता काही आपले खरे नाही, तिकडे सगळा घोटाळा होणार आणि पूर्ण रात्र ऑफिस मध्ये जाणार, एकतर माझे हे काम नाही तरी लटकवले आहे मला"
तर दुसरा म्हणत होता " देवावर विश्वास ठेवा, त्याचा कृपेने सगळ ठीक होईल, चिंता नको. हरी ओम"
"अरे काहीही प्रोब्लेम येऊ दे, आपण आरामात फिक्स करू .." तिसरा ह्या मताचा होता.
आणि शेवटचा असा विचार करत होता "काहीही होऊ दे, तिघांपैकी कोणीतरी पाहून घेतील काळजी नसावी".
राशींप्रमाणे माणसाचा स्वभाव असतो म्हणतात, आयटीमध्ये डेझिगनेशन प्रमाणे विचार बदलतात असो.
फोनची रिंग ने आमची झोपमोड केली, तिकडून पहिली बातमी आली. अपेक्षेप्रमाणे ती चांगली नव्हती. म्हणजे आमची सिस्टीम व्यवस्थित चालू होती, नेहमीप्रमाणे प्रश्नच नाही. आपला तो बंडू दुसर्या कंपनीचं ते कार्ट...
आतापण नेटवर्कमध्ये काहीतरी प्रोब्लेम होता. पण आम्ही काही आता सुटका नाही हे स्वच्छ दिसत होत.
AC १८ डिग्रीने हवेचा झोत सोडत असूनसुद्धा असून सुद्धा वातावरण एकदम गरम होते, प्रसंगच तसा होता, उच्च पदावरील अधिकार्याचे केबिन, एकदम हॉट झालेला तो कस्टमर, कोणालाही सुटणार नाही असा प्रॉब्लेम आणि त्याचे solution काढण्यासाठी जमलेले ५ -६ लोक.
शाळेत आपण जे काही विज्ञान शिकलो त्याचा आयटी मध्ये काही उपयोग नाही. सगळेच नियम इथे उलटे आहेत.
एखादी गोष्ट खूप हॉट झाल्यावर वितळते, इकडे हॉट झालेल्या कस्टमरला वितलवण्यासाठी त्याला कुल डाऊन करावे लागते.
"every action has equal and opposite reaction" हा नियम घोकम पट्टी करून तुम्ही आम्ही मार्क मिळवले आहेत. पण Every reaction ( of customer ) starts many actions on us
हे समजायला थोडी वर्ष लागतात.
एक साधा नियम आहे कोणताही प्रोब्लेम एकाला सोडवायला दिला तर तो सहज सुटतो, दोघा तिघांनी मिळून फिक्स करायचा असेल तर तो थोडा कॉम्प्लेक्स बनतो. ४ -५ जणांच्या discussion मध्ये साधा प्रोब्लेम पण गंभीर बनतो, त्याचे मुख्य कारण म्हणजे एकाचे solution कसे चुकीचे आहे ह्याची ५ वेगवेगळी कारणे समोर येतात. १० - १२ मिटींग्स नंतर पहिलेच solution निवडले जाते हि गोष्ट वेगळी. आणि इथे तर ६-७ लोक होते आणि ते हि मैनेजेर्स.. पहिला अर्धा एक तास चांगली चर्चा झाली, मग चर्चेचे रुपांतर सामुहिक आणि नंतर वैयक्तिक भांडणात झाले. सगळेजण आपला मुद्धा उचलून धरत होते,
त्यादिवशी माझ्या ज्ञानात थोडी मोलाची भर पडली.
"वो देखना पडेगा", ह्याचा आयटी मधला अर्थ असा कि एकतर मला येत नाही किंवा मला करायचे नाही. आपल्याकडे समोरच्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नसेल तर सरळ हे उत्तर देऊन मोकळ व्हावं.
२ -३ तासाचा गंभीर चर्चेनंतर शेवटी असे ठरले कि आज रात्री परत एकदा टेस्ट करून पाहू आणि मग ठरवू की करायचे. रात्री २ वाजता परत काम चालू झाले, आम्ही सकाळी ६ पर्यंत प्रॉब्लेम शोधात होतो. आम्ही चार तास ज्या प्रश्नाचे उत्तर शोधत होतो तो आलाच नाही, त्या दिवशी परत तो प्रॉब्लेम आलाच नाही. दुसर्या दिवशी सगळीकडून आमचे कौतुक होत होते. कौतुकाचे मेल्स येत होते, पण मी मनात ह्याच विचारात होतो कि आपण असे नक्की काय केले...
"अरे झोपतोस काय ? उठ. नेटवर्क इंजिनियरला कॉलवर आहे"
मित्राच्या आवाजाने मी भानावर आलो. हे तर मागच्या महिन्यात घडलेले मी स्वप्नात पाहत होतो. मग जसा मागच्या वेळी काहीच न करता प्रॉब्लेम संपला तसाच आता पण संपला झाले तर किती बरे होईल असा स्वार्थी विचारने मी फोन उचलला. कॉल १ -२ तास चालला आणि अर्थातच प्रॉब्लेम पण संपला.
सुटलो ... एकदाचे आम्ही सुटलो. आषाढी पौर्णिमेच्या ढगाळ रात्री अंधारात पन्हाळा उतरून, शत्रूच्या पहिल्या छावणीतून बाहेर पडल्यावर मावळ्यांच्या मनात जे भाव असतील तसे आमचे भाव होते. आमचे काम झाले होते आम्ही फक्त तोफांची वाट पाहत होतो, एकदा डेटा सेंटर मधून कॉल आला कि आम्ही सुटलो घरी. काल पासून ऑफिस मध्ये घालवलेल्या १६ तासांपेक्षा आताचे १६ मिनिट जास्त वाटत होते. .. आणि आलाच अखेर फोन ची रिंग वाजली, आता सुटलो ह्या आनंदात मी फोन उचलला.
"बॉस, Where are you ? आजच्या GO LIVE ची प्लानिंग मीटिंग आहे, लवकर ये"
फोन मैनेजर चा होता.
"काय ??"
थबकून मी घडयाळ पाहिलं सकाळचे ११.३०.
हा सगळाच भास होता. मी चक्क दिवसा स्वप्नं पाहत होतो. अजून बाकी आहे दिवस..आणि रात्रीचे go live पण.. नुसत्या जुन्या आठवणीनी मी थकलो होतो अजून संपूर्ण दिवस समोर होता समोर दिसणाऱ्या मीटिंग रूमच्या दाराकडे पाहत म्हणलो,
"आजचा दिवस खरच खूप मोठा आहे"