Monday, February 13, 2012

४ आकड्यांचा प्रवास...




ऱेल्वेचा प्रवास हा माझा तसा आवडता प्रवास. ह्या मागे कारण तिथे मिळणारी मोकळीक, का झोपायला मिळणारा बर्थ, का प्रवासात भेटणारी माणस, का बसमध्ये नसलेलं toilet ह्या पैकी एक ठरवणे तसं अवघड आहे. पण तरी रेल्वेने कितीहि दूर जाण्यासाठी मी नेहमी तयार असतो. रेल्वे म्हणलं काही गोष्टी ठरलेल्या असतात, मी शेकडो वेळा प्रवास केला असेल पण कधीही सुरवातीपासून confirm seat मिळालेली नाही, अगदी २ - ३ महिने आधी बुकिंग केले तरी माझा नंबर waiting मध्येच येतो. मग त्यादिवशी आधी तो चार्ट शोधा, चार्ट नाही सापडला तर तो TC शोधा, आपल्या बोगी पासून आपण १० डब्बे लांब आहे म्हणून पळापळ करा. २ तास आधी पासून तुम्ही स्टेशनवर आलात तरी स्लॉग ओवर मध्ये हि धावपळ करावीच लागते।


आज आम्ही तसे थोडे निर्धास्थ होतो, seat नेहमीप्रमाणे confirm नव्हतीच पण आमच्या काकांकडे इंटरनेट असलेला mobile असल्यामुळे. "आपली seat काही जात नाही रे कुठे, एक मिनिटात मोबाईलमध्ये कळेल" असे बोलून काकांनी मला गप्प केले. मला मोबाईलमधले फारसे काही कळत नाही, खरंतर मी कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यात मोबाईलवरती इंटरनेट आणि फेसबुक म्हणजे तर कहरच. कुत्रे आपण का पाळतो, घराचे रक्षण त्याला करता आले म्हणजे बास. त्याला मागच्या पायावर उभे राहता येते किंवा त्याला पेपर उचलून आणता येतो, ह्याचा दोन क्षणांची करमणूक ह्या पलीकडे काय उपयोग आहे. मोबईलचेहि तसेच आहे. दुसर्या लोकांनी आज काय काय केले हे आपण आपला पैसा घालवून पाहत बसण्यासारखा दुसरा मूर्खपणा नाही. असो तर गाडी सुटण्यासाठी १० मिनिट्स असताना काकांनी IRCTC वर आमचे seat नंबर पहिले. ९४३ आणि ९४४, आता एक डब्यामध्ये ७२ बर्थ असल्यामुळे हे नंबर कुठले...ह्या गोंधळात आम्ही पडलो.. ५ मिनिटे बाकी असल्यामुळे परत आमची TC शोधण्याची धावपळ चालू... ९४३ म्हंजे S9 ४३ हा उलगडा झाल्यानंतर आम्ही आमच्या जागेवर पोहोचलो. आजकाल रेल्वेमध्ये मला एक निराळीच चिंता असते, आपल्या समोर बसलेले आतिरेकीच आहेत आणि त्यांच्याकडे बॉम्ब आहे. एकदा सगळ्यांची पाहणी आणि त्यांच्या सामानाची पाहणी केल्यावर मला हायस वाटलं, त्यापैकी कोणी त्यातले वाटत तर नव्हते. एव्हाना गाडी सुटली होती आमचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु झाला होता. आमच्या बाजूला एक गुजराथी कुटुंब.. समोर एक मुस्लीम कुटुंब असे आमचे शेदारी होते. गुजराथी प्रवासी ओळखणे अगदी सोपे असते, गाडी सूटल्यानंतर पहिल्या १० मिनिटात जो चिवड्याचा डब्बा उघडतो तो गुजराथी... त्याच कुटुंबामध्ये एक अतिशय सोज्वळ आणि सुंदर मुलगी होती. आमच्या समोर बसलेल्या मध्ये दोन जोडपी होती. त्यातल्या एका नवरा बायकोचे भांडण चालू होते आणि दुसरे दोघे त्याची समजूत काढत होते. दहा तासांच्या प्रवासात सुरवातीलाच नवरा बायकोच्या भांडणाचा फार्स मिळाल्यामुळे आम्ही खुश


काकांनी अगदी समाधान होई पर्यंत माहिती घेतली।


"आपके चेहेरे पे लिखा है कि आपको अच्छा जीवनसाथी मिला है"


काकांच्या ह्या वाक्यानंतर तिच्या चेहर्यावरती एकदम कुतूहल जागे झाल्याचे माझ्या लक्षात आले।


"आपको face reading आता है ?"


"face reading जादा नाही लेकीन हात कि रेखा पढना आता हैं"।


काकांच्या ह्या उत्तरांनी मी तीन ताड उडालो. माणसाचे वय कितीही झाले तरी परक्या बाईचा हात हातात घेण्याची संधी तो सोडत नाही।


"तो आप इनका हात देखके बताओ ना की क्या ये आदमी कभी पैसा कमाएगा" .. माझे हसू लपवण्यासाठी मी दुसरीकडे पाहू लागलो. माझं लक्ष त्या गुजराथी मुली कडे गेलं, पेपरचा आधार घेऊन ती गुपचूप माझ्याकडे पाहत होती. जशी आमची नजर एकमेकांना भेटली तसा तिने आपला चेहरा पेपरने झाकला. मला मोठी गंमत वाटली. एकदोन वेळा हाच प्रकार झाल्यानंतर मला खात्रीच पटली कि ती माझ्याच कडे पाहत होती. एक वेणी, सुंदर जांभळी रंगाचा ड्रेस, रेखीव डोळे ह्यामुळे चेहरा साधा असूनसुद्धा ती सुंदर दिसत होती. तिच्या डोळ्यांचा रंग काही मला ठीक दिसत नव्हता कारण तिचा चष्मा मध्ये येत होता. आमचा एकमेकांकडे चोरून पाहण्याचा खेळ चालू झाला होता. मग मी ठरवले कि तिला खूण करून चष्मा काढायला लावायचा. मी वेगवेगळ्या खुणा करून तिला हे सुचवू लागलो. काही वेळानंतर तिला माझी खूण समजली असावी कारण तिने चष्मा कडून ठेवला. थोडीशी निळसर झाक असलेले तिचे डोळे पाहून तर मला वेड लागले. रात्रीचे जेवण झाले होते आता मी थोडे धाडस करायचे ठरवले. तिचा मोबाईल नंबर मिळावा म्हणून तिला माझा मोबाईल दाखवला. तिने मला पाच अशी खूण केली. पाच ने कुठला मोबाईल नंबर चालू होतो ? तिच्या डाव्या हाताने ती चार ची खूण करत होती.. हात तिच्या ती पहिला आकडा ९ सांगत होती. सगळे नेटवर्क ९ नेच चालू होतात तो नंबर सांगायची काय गरज शेवटी सगळ्या पोरी म्हणजे ... आज नंबर इतर आकड्यांनीही चालू होतात पण तेव्हा तसे नव्हते.


असो .. आमचा पुढच्या नंबरसाठी परत दम-सराज चालू झाला. ती खुणेने कॉलर दाखवत होती. आता कॉलरवरून नंबर कसा समजणार. माझा शर्ट हिरवा होता पण त्याचा नंबर काही संबंध नाही. कॉलर मध्ये ३ अक्षरे आहेत म्हणजे पुढचा नंबर ३ असावा असे वाटले म्हणून मी बोटांनी ३ अशी खुण केले. तिने कपाळावर हात मारून घेतला. कोणीतरी जवळ असल्यामुळे तिला हाताने खुण करता येत नव्हती. परत कॉलर .. मला काही कॉलरचे कोडे सुटत नव्हते. मला एक कळत नाही ज्या मुलाशी आपली धड ओळख नाही, ओळख सोडा एक शब्दहि बोलणे नाही त्याला कोडी कसली घालायची. आणि मी तरी ती का सोडवायची. पण तरीहि मी सोडवायचा खूप प्रयत्न करत होतो, एकतर फुकट आणि मुंबई उद्या सकाळी येणार होती त्यामुळे करण्यासारखे दुसरे काहीच नव्हते. अचानक माझे लक्ष माझ्या बर्थ नंबर कडे गेले, मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला. ती मला कॉलर नाही बर्थ नंबर सुचवत होती. कोणीतरी एकदम लाईट बंद केले. अजून ८ नंबर बाकी आहेत ह्या काळजीने मला झोप येत नव्हती. गाडी अगदी पहाटेच बोरीवली ला पोहोचणार होती. लोकांच्या गडबडीचनेच मला जाग आली. उतरण्यासाठी लोक सामानाची आवरावर करत होते आणि ती कदाचित मी उठण्याची वाट पाहत होती कारण मी तिच्याकडे पाहिल्या पाहिल्या तिने मला पुढचे दोन नंबर सांगून टाकले , म्हणजे हाताने ४ आणि ३. स्टेशन जवळ येत होते, गाडी हळू हळू थांबत होती. तिची सामानाची आवारावर चालू होती. पर्स ठेवताना, air bag आवरताना तिची हळूच येणारी एक नजर मला अस्वस्थ करत होती. मी सर्व प्रकारे तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो. गाडी बोरीवलीला थांबली, लगेचच सगळीकडे धावपळ उडाली. त्या गडबडी मध्ये ती कुठेतरी दिसेनाशी झाली. उतरणारे प्रवासी आणि हमाल लोकांची कटकट कमी होण्यासाठी बराच वेळ लागला. शेवटी मीच निश्चय करून platform वर उतरलो. अर्थातच माझे डोळे तिला शोधू लागले. ऑफिससाठी लोकलची वाट पाहणारे मुंबईकर आणि पाहुण्याला receive करायला आलेले ह्यांनी तो platform गजबजून गेलेला होता. अचानक गर्दी मध्ये काहीतरी शोधणारा तिचा चेहरा मला दिसला. ती कदाचित मलाच शोधात असावी कारण आमची परत नजरभेट झाल्यावर तिचा चेहरा एका हलक्याश्या स्मिताने खुलला. शिट्टीच्या आवाजाने मी भानावर आलो. गाडी पुढच्या प्रवासाला निघाली होती. मी बोगीच्या दारामध्ये थांबलो, मागे वळून परत तिच्याकडे पाहिलं, आपण परत कधीच भेटणार नाही हे आम्हाला माहित होत. गाडीने आता वेग घेता होता, आधी ती मग गर्दी मग platform सगळ दिसेनास झाल. मी बराच वेळ तसाच दारामध्ये उभा होतो आणि हातामधल्या कागदकडे निरखून पाहत हसत होतो. त्यावर फक्त ४ नंबर होते ९७४३ .........



Nilesh Patankar

2 comments:

Janhvi said...

छान,साधं, सरळ, सुटसुटीत .....
वाचताना प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले....
"शेजारी"
हा शब्द चुकीचा type झाला आहे.सुधारला तर अजून मजा येईल.

Vidya B said...

Loved it :)
Asusual..humor was out of this world...
felt bad...u cudnt get rest of the numbers...expecting ur next article based on "punha ti mala bhetli" :p